नाशिक - डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचे आगमन होताच जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. लाखो किलोमीटरचे हवाई अंतर कापूस विदेशी पक्षी देखील या भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे अभायरण्यामध्ये देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पक्षी निरीक्षकांसाठी व पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे.
गोदावरी नदीवर नांदूर-मध्यमेश्वर, कोठुरे, मांजरगाव, चापडगाव, काथरगाव या गावातील अभयारण्यामध्ये पाणथळ जागा मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशातून पक्ष्यांचे आगमन होत असते. हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. डिसेंबर अखेरपर्यंत अभयारण्यात सुमारे ३० हजारांहून अधिक पक्ष्यांनी हजेरी लावल्याचे वन विभागाने सांगितले.
यंदा पाऊस जास्त झाल्याने पाण्याची पातळी देखील जास्त आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. तरी देखील ८ ते १० फ्लेमिंगो येथे पाहायला मिळतात. यासोबतच शॉवलर, गडवाल, रेड क्रेस्टेड, रुढी शेल डक, पेंटेड स्टॉक, कॉमन क्रेन, मार्श हैरियर, पाइड किंग फिशर, ब्ल्यू थ्रोट, ब्लॅक टेन गोडीट, पिंटेल यासह आदी पक्षी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच थंडी देखील उशिराने सुरू झाल्याने यंदा अधिक काळ पक्ष्यांचा मुक्काम राहील, असे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला लवकरच पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे पर्यटकासंह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.