नाशिक - 28 मे हा दिवस 'मेन्स्ट्रुअल हायजीन डे' म्हणजेच मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. डब्ल्यूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून हा दिवस जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून घोषित केला आहे. यासाठी 28 मे ते 3 जून हा आठवडा मासिक पाळी स्वच्छता जनजागृती आठवडा म्हणून सबंध जगामध्ये साजरा केला जातो. मासिक पाळीसाठी मेन्स्ट्रुअल कप हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वैद्यकीय समुपदेशक अश्विनी चौमाल यांनी म्हटले आहे.
भारतात महिलांच्या मासिक पाळीवर आजही उघडपणे बोलले जात नाही. मात्र, महिलांची जनजागृती करणे काळाची गरज आहे. भारतात ३० कोटीपेक्षा जास्त महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. म्हणून २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी दिवसाचे निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी या दिवशी जनजागृती करत असतात, यात महिलांचाही सहभाग लक्षणीय असतो. विज्ञान आणि प्रगतीच्या युगात आजची महिला मासिक पाळी आणि स्वछता याबाबतीत असलेली महिलांची उदासिनता स्वतःचे आरोग्य आणि पर्यावरणाची हानी धोक्याचे चित्र निर्माण करणारी आहे.
मेन्स्ट्रुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलिकॉन (medical grade silicone) पासून बनलेले वैद्यकीय साधन आहे. हे लवचिक असल्यामुळे योनीमार्गात सोप्या पद्धतीने घालता येते. हे उपकरण 12 तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेकशन देते. मेन्स्ट्रुअल कप वापरून आपण धावू शकता, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम करू शकता, एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे 5 ते 6 वर्ष वापरता येतो. यामुळे पर्यावरणसाठी पण उपयुक्त ठरणारे मेन्स्ट्रुअल कप पुन्हा वापरण्या योग्य असून त्याचा कचरा निर्माण होत नाही. यामुळे पर्यावरणालाची हानी होत नाही.
मेन्स्ट्रुअल कप वन टाइम इन्व्हेस्टमेंट असून सॅनिटरी नॅपकिन पेक्षा स्वस्त पडते. मेन्स्ट्रुअल कप मासिक स्त्राव absorb न करता गोळा करते, मासिक स्त्राव त्वचेच्या संपर्कात येत नाही म्हणून कपमुळे कोणत्याही प्रकारचे रॅशेस (rashes) संक्रमण होत नाही. कप योनीमार्गात सील बंद असते म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान कसलाही वास व दुर्गंध येत नाही. भारतात प्रती महिना ३० कोटी पेक्षा जास्त महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. सरासरी प्रत्येक महिला दर महिन्याला 10 सॅनिटरी पॅड वापरते, म्हणजे 300 कोटी सॅनिटरी पॅडचा कचरा गोळा होतो. सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही. शिवाय त्याला जाळले तर त्यातून विषारी वायू बाहेर येतो. त्यामुळे वायू प्रदूषण होते. जर आपण वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या वजनाचा हिशोब केला तर, ३० कोटी महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सचा ९०० मेगा टन एवढा कचरा होतो. म्हणून कापडी पॅड अथवा मेन्स्ट्रुअल कप वापरणे फायदेशीर असल्याचे वैद्यकीय समुपदेशक अश्विनी चौमाल यांनी सांगितले.