नाशिक - कोराचे हाँटस्पाँट असलेल्या मालेगाव शहराची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता शासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची नियुक्ती मालेगावला केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढला असून कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्यासाठी कडासने यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कडासने यांनी या अगोदर मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम केले असल्याने मालेगावतील नागरिकांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे.
शहरात करोनाचे थैमान रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः या कालावधीत महापालिका व महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अनेक अधिकारी नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस दलातदेखील आता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी नियुक्ती केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनात अनेक बदल्या व नियुक्त्या आतापर्यंत झाल्या होत्या. मात्र, पोलीस दलात अद्याप कोणतेही फेरबदल झाले नव्हते. सुनील कडासने यांनी याआधी मालेगाव शहरात सेवा बजावली आहे. त्यामुळे त्याची काही दिवसाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे.