नाशिक - परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी विविध पक्षातील नेते जिल्ह्यात दौरे करत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्या पाठोपाठ रामदास आठवले, गिरीश महाजन यांनी देखील जिल्ह्यातील शेत पिकांची पाहणी केली. तर, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत.
दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याबरोबर, द्राक्ष, मका या सारख्या विविध पिकांची लागण केलेल्या शेतांची पाहणी केली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आदित्य यांना शेतात घेऊन जात द्राक्ष बागेत अडकलेल्या ट्रॅक्टरची अवस्था दाखवली आणि झालेल्या नुकसानीची व्यथा सांगितली. त्यावर शिवसेना तुमच्या सोबत आहे, असा धीर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. त्याचबरोबर, तालुक्यात ओला दृष्काळ जाहीर करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.