नाशिक : गेल्या आठ ते दहा वर्षात नाशिकच्या मानवी वस्तीत बिबट्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांना नाशिकची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. शहराच्या आजूबाजूच्या भागात असलेली उसाची शेती, या शेतात जन्म घेणाऱ्या बिबट्याला शुगर कॅन लेपर्ड असे म्हटले जाते. जिथे जंगलात बिबट्याच्या मादीने चार पिल्लांना जन्म दिला तर त्यातील दोन बछडे जगायचे. मात्र उसाच्या शेतीत जन्म दिलेले सर्व बछडे जगतात, उसाचे शेत त्यांना सर्वच दृष्टीने पूरक असल्याने बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यात 300 हून अधिक बिबटे : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांचा वावर आता नित्याचा झाला आहे. त्यामुळे मानव आणि बिबट्यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात नेमकी बिबट्यांची संख्या किती याबाबत वन विभागाकडे अचूक माहिती नसली तरी, 100 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाच बिबटे आणि पाच तरस राहत असल्याचे एका संशोधनातून सांगितले जात आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात 300 हून अधिक बिबटे असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 1883 चे नाशिकचे गॅझेटिअर पाहिले की, लक्षात येत की, त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी होती. तसेच गावापरिसरात ये-जा करणाऱ्या बिबट्यांची संख्या पूर्वीपासूनच आहे.
बिबट्या लाजाळू आणि घाबरट प्राणी : प्राणीशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी आहे. नाशिक जिल्ह्यातील दाट असलेले वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गाव, शहर परिसरात अस्वच्छतेवर कुत्रे, मांजरी, डुकरे हे प्राणी आपली गुजराण करतात. त्यामुळे गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रे, मांजर आणि डुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गाव, शहराकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
80 टक्के शुगरकेन लेपर्ड : नाशिक सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकमध्ये कांदा, द्राक्षापाठोपाठ उसाचे क्षेत्रफळ मोठे आहे. तसेच गोदावरी, दारणासारख्या नद्या असल्याने, या नदीच्या काठाला असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याला सुरक्षित वाटते. याठिकाणी मादी बछड्याना जन्म देते, वर्षभरहून अधिक काळ बिबट्याचे वास्तव्य इथे असते. तसेच उसाच्या बाहेर पाडताच त्यांना भक्ष्य म्हणून कुत्रे, वासरू, मांजरी, डुकरे सहज उपलब्ध होत असल्याने, बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वनविभागाच्या एका सर्वेनुसार 80 टक्के शुगरकेन लेपर्ड नाशिक जिल्ह्यात आहेत.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने, बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी, ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.
हेही वाचा -