नाशिक(मालेगाव) - उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नाशिक जिल्ह्यात असून त्यातही मालेगाव शहरात ही संख्या जास्त आहे. या भागात संचारबंदीसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मालेगावात दफन विधीला 500 लोक एकत्र जमा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावातील मुशावर चौक भागात पोलिसांनी या जमावाला थांबवत त्यांची समजून काढली. अक्षरश: त्यांच्या समोर हात जोडून पोलिसांनी त्यांना विनंती केली. तरी देखील 25 जण दफन विधीसाठी कब्रस्थानकडे मार्गस्थ झाले.
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून आत्तापर्यंत 99 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरामधील आहेत. मालेगाव शहरात आत्तापर्यंत 85 जणांना कोरोनाची लागण झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मालेगाव शहराला लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मालेगाव शहरात येण्यासाठी आणि शहरातून बाहेर जाण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कार आणि दफनविधीसाठी 5 पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये, अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, तरीही संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडत मालेगावात एका दफन विधीला पाचशे लोक एकत्र जमल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी या जमावाला थांबत त्यांची समजून काढत नागरिकांनी गर्दी न करता घरी जावे, अशी विनंती केली.