नाशिक - दिवसेंदिवस नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मिळून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, त्यांच्याकडून हॉस्पिटल अतिरिक्त बिल आकारात आहेत, अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिकेला प्राप्त होत होत्या. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात नागरीकांसाठी 24 तास हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 791 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 496 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 717 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरातील असून, अजूनही दिवसाला 400 ते 500 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही. खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अतिरिक्त बिल आकारण्यात येत असलेल्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यावर आता नाशिक महानगरपालिकेकडे हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या सूचनेनंतर कोरोना हेल्पलाईन कक्ष स्थापन..
आठ दिवसांपूर्वी खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह लोकप्रतिनिधींचीनाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधींनी शरद पवार यांच्यासमोर नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी हॉस्पिटल ज्यादा पैसे आरकारात आहेत, अशा तक्रारी केल्या होत्या. यावर शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महानगरपालिकेत कोरोना हेल्पलाईन सुरू करावी अशा सूचना मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना केल्या होत्या. त्यानंतर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
हेल्पलाईन क्रमांक - 9607623366
नाशिक महानगरपालिकेचे हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण 47 कोविड हॉस्पिटल
एकूण बेड संख्या 2935, रिक्त बेड संख्या 1465
एकूण ऑक्सिजन बेड 642, रिक्त बेड 180
एकूण आयसीयू बेड 280, रिक्त बेड 151
एकूण व्हॅटिलेटर बेड 137, रिक्त बेड 43
एकूण जनरल बेड 1876, रिक्त बेड 1091