नाशिक - मालेगावात एकाच दिवशी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगाव शंभरी पार करणारा राज्यातील पहिला तालुक ठरला आहे. मालेगावात संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची खंत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून आज एकाच दिवशी 14 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी पार केली. बाधित रुग्णांचा आकडा 110 वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 124 वर जाऊन पोहचला आहे.
मालेगावात नागरिक संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करत असून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपवत आहेत. त्यामुळे हा आकडा वाढत जात असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव हे 'हॉटस्पॉट' म्हणून जाहीर करण्यात आले असून मालेगाव शहरात येण्यास आणि जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे.