नंदुरबार - नंदुरबार शहरात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर खानसामाचा अहवाल दुसर्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला असून, त्यात एका युवकासह जिल्हा रुग्णालयातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तीन नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 44 झाली आहे.
नंदुरबार शहरातील राजीव गांधी नगरातील एका 35 वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तसेच जिल्हा रुग्णालयातील दोन जणांचा आहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. परवा एकाच दिवशी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नंदुरबार शहरातील गाजी नगरमधील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता सलग तिसर्या दिवशी कोरोना रुग्ण आढळले आहेत. नवीन तीन रुग्णांची आणखी भर पडली असून राजीव गांधी नगरातील युवकाचे मुंबई कनेक्शन असल्याचे दिसते. तो त्याच्या काही मित्रांसह तीन ते चार दिवस मुंबई येथे फिरण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यावर त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात त्याच्या स्वॅब नमुना घेण्यात आला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. आर. तडवी हे गांधी नगरात काल रात्री दाखल झाले. कोरोनाबाधिताच्या संपर्कातीन तीन नातेवाइकांना क्वारंटाइन करण्यात आले. कोरोनाबाधिताच्या घराजवळील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून, आजपासून आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. अन्य दोन पॉझिटिव्ह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. दोन्ही महिला कर्मचारी असून, एक 28 तर दुसरी 30 वर्षीय आहे.
गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या खानसामाचा शासकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी नाशिक येथे खासगी रुग्णालयातील अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा पुन्हा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.