नंदुरबार - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. जनता आमच्या सोबत आहे, असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पक्ष सोडणाऱ्याची कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. पुन्हा नव्या उमेदीने सक्रिय व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कार्यकर्त्यांना केले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व शेतकऱ्यांचा समस्या ऐकण्यासाठी प्रदेशाध्यक्षा चाकणकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता चौपाळे (ता.नंदूरबार) येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप सरकारचा पाच वर्षांचा काळात नोकर भरती बंद करण्यात आल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. परदेशी कंपन्यांचे कर्ज माफ करण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. आजही ७४ हजार बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले.
संकटाच्या काळात ज्यांनी पक्षाला साथ न देता सोडून गेलेल्यांची चिंता करायची नाही. कार्यकर्त्यांनी पुन्हा सक्रिय होत पक्षाच्या कामांना सुरुवात करावी. लवकरच जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली, जाईल अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. मेळाव्यात अनेक महिलांनी समस्या मांडल्या.
जनतेने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. आता कार्यकर्त्यांनी सक्रिय होत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.