नंदुरबार - जिल्ह्यात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. गुजरातच्या सीमावर्ती भागावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात पतंग व मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. मात्र, यात नायलॉन मांज्याचीही विक्री विक्रेते मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.
नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी
नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, काहींनी आपला जीव गमावला आहे. गेल्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एका महिलेचा नाकाला गंभीर इजा झाली होती. तर, एका व्यक्तीला आपला डोळा गमवावा लागला होता.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास कारवाईचे संकेत
जिल्ह्यातून 55 हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नॉयलॉन मांजा विक्रीवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवशी जिल्ह्याभरात नॉयलॉन मांजा विकणार्या 15 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 55 हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नॉयलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यामुळे महिनाभर अगोदरच पतंग व मांजा विक्रीची दुकाने लागतात.
जिल्ह्यात विविध विक्रेत्यांवर एलसीबीची कारवाई
नंदुरबार शहर, नवापूर, विसरवाडी, शहादा, म्हसावद, तळोदा पोलीसांनी परिसरात मांजा विक्रेत्यांच्या दुकानाची झाडाझडती घेतली. या तपासणीत जिल्ह्यातील 15 विक्रेत्यांकडे नॉयलॉन मांजा सापडला. पोलीसांनी 55 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील स्वप्निल प्रमोद सोनवणे यांच्याकडून 5 हजार शंभर रुपये किंमतीचा नॉयलॉन मांजा, खांडबारा येथील पांडुरंग भोंगडा गावीत यांच्याकडून 2 हजार 700 रुपये किंमतीचा, शहाद्यातील जगदीश राठोड यांच्याकडून 4 हजार 200 रुपये किंमतीचा, योगेश शांतीलाल चित्ते यांच्याकडून 18 हजार 450 रुपये किंमतीचा, जितेंद्र शांतीलाल चित्ते यांच्याकडून 1 हजार 400 रुपये किंमतीचा, तळोदा येथील संतोष राजाराम जोहरी यांच्याकडून 2 हजार 950 रुपये किंमतीचा व आनंद गोपाळकृष्ण शर्मा यांच्याकडून 11 हजार 750 रुपये किंमतीचा यासह उर्वरित विक्रेते अशा एकूण 15 विक्रेत्यांकडून 55 हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - नाशिक : नायलॉन मांजा आढळल्यास दुकान परवाने रद्द करणार, पोलीस आयुक्तांची माहिती