नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यात जवळपास 70 टक्के लोक हे आदिवासी असल्याने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जातात. मांडवी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना डीबीटी आणि सायन्ससारख्या महत्त्वाच्या विषयाचे शिक्षकच शिकवण्यासाठी उपलब्ध नसल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी तब्बल 65 किलोमीटर पायपीट करून तळोदा प्रकल्प कार्यालय गाठले व अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
हेही वाचा - Shiwaji Maharaj Jayanti 2022 : पाच हजार स्क्वेअर फुटमध्ये साकारली महाराजांची रांगोळी; अनोखे अभिवादन
अतिदुर्गम भागातील मांडवी आश्रम शाळेत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक उपलब्ध होत नाहीत व डीबीटीची योजना मिळत नसल्यामुळे अखेर विद्यार्थिनींनी 65 किलोमीटरचा पायी प्रवास करून तळोदा प्रकल्प कार्यालय गाठले व आपल्या समस्या प्रकल्प अधिकारी यांच्यासमोर मांडल्या. शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून डीबीटीद्वारे मिळणारा पैसा मिळालेला नाही. या सारख्या अनेक समस्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असल्यामुळे आदिवासी विकास विभाग नेमके काय करते, असा प्रश्न पडत आहे.
मुख्याध्यापकांबद्दल विद्यार्थिनींमध्ये नाराजी
शाळेतील मुख्याध्यापक सूर्यकांत पावरा यांची तात्काळ बदली करावी. कारण ते नेहमी गैरहजर असतात, तसेच विद्यार्थिनींनी मांडलेल्या कोणत्याही समस्या सोडवत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विषय शिक्षक नसल्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
भौतिकशास्त्र, भूगोल, इतिहास यांसारख्या प्रमुख विषयांचे शिक्षकच शिकवण्यासाठी शाळेत नसल्याने शिक्षण मिळत नाही. तसेच, पुढील काही दिवसांवर असणाऱ्या परीक्षांमध्ये आम्ही काय लिहिणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले.
डीबीटीद्वारे मिळणारा लाभापासून वंचित
शासनाकडून मिळणाऱ्या डीबीटी योजनेचा लाभ हा विद्यार्थिनींना गेल्या दोन वर्षांपासून मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. विद्यार्थिनींना वह्या, पुस्तके व इतर खर्चासाठी डीबीटीद्वारे मिळणारे पैसे गेल्या दोन वर्षांपासून मिळालेले नाही. त्यामुळे, शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. तसेच, वीज नसल्यावर गावातून पाणी आणावे लागते व स्वयंपाकीन कमी असल्यामुळे जेवण वेळेवर मिळत नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी तळोदा प्रकल्प अधिकारी मैंनक घोष यांच्यासमोर मांडल्या.
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर परतल्या विद्यार्थिनी
पायी चालून आपल्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या प्रकल्प अधिकारी मैंनक घोष यांनी समस्या ऐकल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थिनी लांबून पायी चालून आल्याचे दुःखही त्यांनी व्यक्त केले. आमच्या मागण्या लवकर पूर्ण करा, अशी मागणी विद्यार्थिनींनी प्रकल्प अधिकाऱ्यांना केली. यावेळी प्रकल्प अधिकारी मैंनक घोष यांनी आश्रमशाळांमध्ये असलेले डीबीटी तसेच, शिक्षकांचे प्रश्न शंभर टक्के खरे आहेत, हे मान्य केले. काही विषय विभागीय आयुक्त स्तरावर असल्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे. आमच्या स्तरावरील समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Nandurbar : वयोवृद्धकडून सानुग्रह अनुदान लांबविल्याचा प्रकार; 'पुष्पा'चा आधार घेत पोलिसांकडून आरोपीला अटक