नंदुरबार - महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या लक्कडकोट येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुजरात राज्यातून एक गाडीतून काळ्या रंगाचे जॅकेट डोक्यावर टोपी घालून दोन व्यक्ती येतात. पार्सल आहे का, असा प्रश्न विचारतात. अचानक गोळीबार होतो. यात प्रवीण गावित या व्यक्तीला किरकोळ जखम झाली. मात्र संबंधित दोघे लगेच तेथून पळून जातात, अशी माहिती प्रवीण गावित या व्यक्तीने दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
अज्ञातांकडून गोळीबार
महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या लक्कडकोट येथे एका व्यावसायिकावर अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या व्यक्तीने गोळीबार केला. यात प्रवीण नामक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. मात्र गोळीबार करण्याचे कारण समजू शकले नाही.
अधिकारी घटनास्थळी
नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर, नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला व घटनेची माहिती घेतली.
परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी
गुजरात सीमावर्ती भागात गोळीबार झाल्याची वार्ता पसरताच पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर नवापूर तालुक्यातील ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. नवापूर करंजी ओवरा, पिंपळनेर चौफुली, विसरवाडी, लक्कडकोट आदी भागात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले.