नंदुरबार - रॅपिड अॅन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आल्यानंतर युवकाने गुजरात राज्यातील उच्छल येथे जावून तपासणी केली असता त्याठिकाणी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. या रागातून सदर युवकाने रॅपिड अॅन्टीजन तपासणी करणार्या शिबीराच्या ठिकाणी हल्ला करीत आरोग्य कर्मचार्याला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नवापूर तालुक्यातील वाकीपाडा गावात घडली. या घटनेचा नवापूर तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेने निषेध नोंदवुन तहसिलदारांकडे युवकाबद्दल तक्रार केली. या युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आरोग्य कर्मचार्यास मारहाण करणार्या युवकाला कायदेशीर शिक्षा होत नाही, तोपर्यंत कामबंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचारी संघटनेने दिला आहे.
आरोग्य सेवकाला मारहाण; कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभरापासून वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरासह ग्रामीण भागात रॅपिड अॅन्टीजन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक गावांमध्ये जावून आयोजित शिबीरातुन नागरिकांची रॅपिड अॅन्टीजन करुन घेत आहेत. नवापूर तालुक्यातील वाकीपाडा येथे आरोग्य पथकाने रॅपिड अॅन्टीजन तपासणी शिबीर घेतले. या शिबीरात 55 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यातील एका युवकाने रॅपिड अॅन्टीजन अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याने लागलीच नवापूरनजीकच्या गुजरात राज्यातील उच्छल येथे जावून तपासणी करुन घेतली. या तपासणीत सदर युवकाचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे उच्छल येथे केलेल्या तपासणी निगेटीव्ह तर शिबीरातील रॅपिड अॅन्टीजनमध्ये पॉझिटीव्ह आल्याचा राग येवून युवकाने वाकीपाडा येथे पुन्हा येवून रॅपिड अॅन्टीजन करणार्या शिबीरातील आरोग्य सेवक दशरथ हिरालाल मुसळदे यांना मारहाण केली. यावेळी कागदोपत्रे अस्ताव्यस्त फेकून आरोग्य कर्मचार्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली.
युवकाची नागपूर तहसीलदारांकडे धाव-
या घटनेनंतर शिबीरातील कर्मचार्यांनी नवापूर तहसिल कार्यालयात जावून तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे तक्रार करुन घटनेची माहिती दिली. यावेळी तहसिलदार कुलकर्णी यांनी सदर युवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार युवकावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रॅपिड अॅन्टीजन तपासणी करणार्या आरोग्य सेवकाला मारहाण झाल्याचा नवापूर तालुका आरोग्य सेवक संघटनेने निषेध नोंदविला आहे. तसेच सदर युवकावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत कामबंद करण्याचा निर्णय नवापूर तालुक्यातील आरोग्य सेवकांनी घेतला आहे.
जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे निषेध-
वाकीपाडा येथील घटना दुर्दैवी आहे. जनतेसाठी अहोरात्र परिश्रम करणार्या आरोग्य कर्मचार्यांवर प्राणघातक हल्ला करणे हे अतिशय निषेधार्य आहे. पोलीस निरीक्षक व तहसिलदार यांच्याशी बोलणे करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचार्यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
हेही वाचा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहायक, सेक्रेटरीची 'सीबीआय'कडून चौकशी