नंदुरबार - पत्नीच्या मृत्यूनंतर एका वयोवृद्धाला शासकीय योजनेतून 50 हजार रुपये मंजूर झाले होते. हे सानुग्रह अनुदान बॅंकेतून घेऊन जात असताना दोन अज्ञात युवकांनी या वृद्धाच्या हातातून पैशांची पिशवी लंपास केली. या दोन्ही युवकांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले आहे. पदम कोळी असे या वृद्धाचे नाव आहे.
असे पकडले आरोपीला -
या घटनेतील प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपींपैकी एकाच्या डोक्यावर कटिंगद्वारे 'पुष्पा' असे नाव लिहले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सर्व सलून व्यवसायिकांशी संपर्क करून युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे मिठू नावाच्या व्यक्तीने पुष्पा, असे इंग्रजीत नावाची कटींग केली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छोटा धनपूर येथे जाऊन पोलिसांनी विनोद ऊर्फ मिठू या आरोपीला अटक केली. तसेच त्यांच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले.
अशी घडली घटना -
डामरखेडा ता. शहादा येथील पदम कोळी यांच्या पत्नीचे कोरोना आजारामुळे निधन झाले होते. त्यांनी सानुग्रह अनुदानसाठी अर्ज दाखल केला होता. त्याआधारे त्यांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. हे अनुदार त्यांच्या स्टेट बैंक ऑफ इंडीयाच्या बँक खात्यावर जमा झाले होते. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी पदम कोळी हे पैसे काढण्यासाठी डामरखेडा येथून प्रकाशा येथे गेले. त्यांनी बँकेतून पैसे काढले तसेच ते पैसे घेऊन घरी परत जात असताना त्यांना तहान लागली. पदम कोळी हे एका हॉटेलवर पाणी पिण्यासाठी थांबले. याच वेळी त्यांच्या हातात असलेली 50 हजार रुपयांची पिशवी दोन आरोपींनी लंपास केली.
पोलिसांची पदम कोळींना मदत -
पदम कोळी यांची 50 हजार रुपयांची पिशवी लंपास झाल्यानंतर त्यांची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी त्यांना मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांची मदत गोळा करून दिली.
हेही वाचा - Muskan Khan Name For Urdu House : मालेगावच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देणार; महापौर ताहेरा शेख यांची घोषणा