नांदेड - इस्लापूर परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक येत असतात. परंतु, काही अतिउत्साही पर्यटकांमुळे यंत्रणा हतबल झाली आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक पद्धतीने पाण्याजवळ जाणाऱ्यांमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने सहस्त्रकुंड धबधब्याच्या कठड्यावर तारांचे कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे.
सहस्त्रकुंड येथे खबरदारीच्या उपाययोजनेसाठी इस्लापूर तथा बिटरगाव पोलीस ठाण्यातर्फे सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे. मात्र, पर्यटक दाद देत नाहीत, अशी खंत व्यक्त होत आहे. सहस्त्रकुंड येथे धबधबा व ग्रीन गार्डन नर्सरी पाहण्याजोगे असल्याने मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. मात्र, सुरक्षाव्यवस्थेवर ताण येत असल्याने दुर्घटना घडत आहेत. या ठिकाणी जमादार जाधव,आशिष जारडे, सतीश चव्हाण हे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.तसेच किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी शासनातर्फे गजर वाजवून पर्यटकांना सावधकरण्याची यंत्र सामग्री बसविली आहे.
यावेळी त्याचे प्रात्यक्षिक व्यवस्थापक मारोती वाघमारे यांनी करुन दाखवले.प्रशासनाकडून अशी खबरदारी घेतली जात असताना अतिउत्साही पर्यटकांमुळे यंत्रणेचा ताण वाढला आहे.
यामुळेच धबधब्याच्या कठड्यावर तारेचे कुंपण घालण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.