नांदेड : नांदेडमध्ये २००८ साली आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणात ११ एप्रिल रोजी न्यायालयाने १९ आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ५ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु यातील अनेकांची दंड भरण्याचीही कुवत नव्हती. ही बाब मातोश्रीपर्यंत पोहोचल्यानंतर शनिवारी तुरुंगात असलेल्या १९ जणांपैकी १५ जणांच्या दंडाची रक्कम पक्षाकडून न्यायालयात भरण्यात आली. या माध्यमातून कट्टर सैनिकांच्या पाठीशी मातोश्री खंबीरपणे असल्याचा संदेश देण्यात आला.
२००८ मधील आंदोलन : सामान्यांच्या प्रश्नावर कोणतेही आंदोलन म्हटले की, शिवसैनिक हे नेहमी आघाडीवर असतात. तोडफोड केल्याशिवाय शिवसैनिकांचे आंदोलन पूर्ण होत नाही, अशी जणू प्रथाच पडली होती. परंतु त्यामुळे अनेक प्रश्नांचा गुंताही सुटत होता. २००८ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना महागाईच्या विरोधात तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आले होते.
प्रकरण अंतिम टप्प्यावर : या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले, त्यामध्ये आठ बसेस, पोलिस वाहनांचे नुकसान झाले. दोन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी जखमी झाले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी तब्बल १९ जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर १५ वर्षांनंतर हे प्रकरण अंतिम टप्प्यावर आले होते. त्यात ११ एप्रिल रोजी माजी आमदार अनुसया खेडकर, त्यांचे सुपुत्र महेश खेडकर यांच्यासह १९ जणांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
मातोश्री शिवसैनिकांच्या पाठीशी : दंडाची रक्कम भरण्याचीही यातील अनेक शिवसैनिकांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे शिवसैनिक आणि परिसरातील मंडळीकडून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात झाली होती, तर दुसरीकडे मातोश्रीकडूनही शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा निरोप देण्यात आला होता. मातोश्रीवरून सूचना केल्यानंतर शनिवारी तुरुंगात असलेल्या १५ जणांच्या दंडाची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयातही पुढील प्रक्रियेत उद्धव ठाकरे गटाकडून या आंदोलनकर्त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. या माध्यमातून कट्टर शिवसैनिकांच्या पाठीशी मातोश्री असल्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे.
शिवसैनिकांच्या कुटुंबांना मोठा दिलासा : ज्या दिवशी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना शिक्षा सुनावण्यात आली, त्याच दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर शिवसैनिकांच्या कुटुंबीयांनाही निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. तो शब्द पाळण्यात आला आहे. त्यामुळे या शिवसैनिकांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामी खासदार विनायक राऊत यांनीही पुढाकार घेतला असल्याची प्रतिक्रिया संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी दिली.