नागपूर - महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पूर्व नागपूरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात राहणा-या हजारो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंढे यांनी डम्पिंग यार्डमध्ये वर्षानुवर्षे जमा झालेला कचरा वैज्ञानिक पध्दतीने बायोमायनिंग करुन ती जमीन मुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उन्हाळयात डम्पिंग यार्डला आग लागण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे वायू प्रदुषणाचा धोका उद्भवतो आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्थमासारख्या रोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. या विरोधात परिसरातील नागरिकांनी हरितलवादात एक याचिका दाखल केली आहे. या प्रश्नावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मागील आठवडयात भांडेवाडी डम्पिंग यार्डला भेट देत आढावा घेतला होता.
असा होता प्रस्ताव -
नागपूर शहरातून येणारा कचरा एकत्रित करण्यासाठी ट्रान्सफर स्टेशनचा प्रस्ताव होता. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पाच ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावित करण्यात आले होते. घरा-घरातून एकत्रित होणारा कचरा छोट्या गाडयांच्या माध्यमातुन ट्रान्सफर स्टेशनला आणणे आणि त्या कच-याला मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडीपर्यंत नेणे अशी प्रक्रिया प्रस्तावित होती. एवढेच नाही तर यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली होती. याकरिता स्मार्ट सिटी प्रकल्पातुनच ४० कोटींची तरतुदसुद्धा करण्यात आली होती.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रस्तावित ट्रान्सफर स्टेशनची निविदा प्रक्रिया रद्द केली आणि ४० कोटी रुपयांची रक्कम मुंढे यांनी बायोमायनिंग प्रकल्पात उपयोग करण्याचा निर्णय घेतला.
भांडेवाडीमध्ये ६-८ लाख मेट्रीक टन कचरा जमा झाला आहे. कच-याच्या ढिगा-यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. या कच-यावर वैज्ञानिक पध्दतीने प्रक्रिया झाल्यास ३२ एकर जागा मनपाला उपलब्ध होऊ शकते.