नांदेड - धर्माबाद शहरातील रुक्मिणीनगरमधील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोर घुसले. मात्र, भूक लागल्यामुळे या चोरट्यांनी त्याच घरात भाज करून पोटभर जेवण केले. यासोबतच पैसेही लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील रूक्मिणनगरमधील रहिवासी किशन आबंटवाड यांचा परिवार आणि त्यांच्याच वाड्यातील भाडेकरू कैलास नागुलवाड दोघेही २३ एप्रिलला बाहेरगावी गेले होते. त्यामुळे रात्री दोन्ही घरांना कुलूप होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी दोन्हीही घरातील आलमाऱ्या फोडून कपडे आणि राशनची नासधूस केली. एवढेच नाही, तर त्यांनी या घरांमधील शासकीय कागदपत्रेही फाडली. चोरट्यांनी कैलास नागुलवाडे यांच्या घरातील ७ हजार रोख रक्कम पळवली. चोरीदरम्यान चोरट्यांना भूक लागल्याने आंबटवाड यांच्या घरात त्यांनी भात करून ताव मारला आणि तेथून पलायन केले. भाडेकरू कैलास नागुलवाड २५ एप्रिलला घरी आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती कळल्यावर घरासमोर बघ्यांची गर्दी झाली.
एक दिवस अगोदर याच गल्लीत शिक्षक शंकर उषापोड यांच्या घरी चोरी झाली होती. धर्माबाद शहरात सर्वाधिक चोऱ्या रूक्मिणनगरमध्ये झाल्या आहेत. मात्र, एकाही चोरीचा आजपर्यंत तपास लागलेला नाही. त्यामुळे नागिरक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त करीत आहेत. लवकरच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.