नांदेड - जिल्ह्यात २५ हजाराची लाच घेताना तलाठ्यास रंगेहात अटक करण्यात आले आहे. बिलोली तालुक्यातील गंजगाव तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या कोटग्याळ येथील तक्रारदाराने खरेदी केलेल्या व वडिलोपार्जीत शेत जमिनीचे फेरफार करून सात बारा देण्यासाठी ४५ हजाराची लाच मागून तडजोडी अंती २५ हजाराची रक्कम खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणाऱ्या गंजगाव सज्जाच्या तलाठ्यासह अन्य एकास लाचलुचपत विभागाने अटक केली. ही कारवाई आठ जानेवारी रोजी करण्यात आली.
बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील होता फेरफार -
बिलोली तालुक्यातील गंजगाव तलाठी सज्जाअंतर्गत येणाऱ्या मौजे कोटग्याळ येथील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या व वडिलोपार्जित जमिनीचा फेरफार करुन ७/१२ देण्यासाठी तलाठी पवन ठक्करोड याने प्रथम ३० हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजाराची रक्कम ठरवण्यात आली. ही रक्कम सुजित रामेश्वर ठक्करोड यांच्या कडे देण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी केला संपर्क -
वैध कामासाठी लाच देण्याची मनःस्थिती नसल्याने तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी म्हणजे एसीबीशी संपर्क साधून माहिती दिली.
सापळा रचून रंगेहात पकडले -
त्यानुसार एसीबीने घटनेची शहानिशा करून बिलोली येथे सापळा रचला. त्याप्रमाणे शुक्रवारी ( दि .८ ) बिलोली शहरातील सावळी रोडवर असलेल्या तलाठी सज्जा कार्यालय परिसरात तलाठी पवन ठक्करोड यांच्या समक्ष सुजित ठक्करोड हा २५ हजारांची लाच स्वीकारताना त्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई -
पोलीस उपअधीक्षक सदर कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पखाले, पोनि बालाजी तेलंगे, गणेश तालकोकूलवार, सचिन गायकवाड, मारोती सोनटक्के यांनी केली.