नांदेड - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुराने तेथील लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नांदेडचे गुरुद्वारा सचखंड बोर्ड धावून गेले आहे. मागील आठवडाभरापासून गुरुद्वाराचा ५० हून अधिक कार्यकर्त्यांचा चमू मदतकार्यात सहभागी झाला आहे. बोर्डाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दररोज १० हजार नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
याबरोबरच कपड्यांसह औषधांचेही वाटपही करण्यात येत आहे. राज्यातच नव्हे तर देशात कोठेही संकट ओढवले, की गुरुद्वारा सचखंड बोर्ड त्या ठिकाणी नेहमीच मदतीसाठी धावून जाते. कोल्हापूर, सांगली पूरही याला अपवाद नाही. कोल्हापूर, सांगलीमध्ये पुरामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या लोकांना पायाभूत सुविधासह अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू तातडीने पुरविणे आवश्यक आहे.
त्यामुळेच गुरुद्वारा बोर्डाने सुमारे ५० जणांची टीम सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविली आहे. सांगली जिल्ह्यातील नांदेगाव, कसबे दिग्रस, पुंदी, अमनापूर, पलूस आदी गावे पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. या गावात गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने दररोज भोजन पुरवठा केला जात आहे.
सांगलीतील टिंबरेनगरमध्ये असलेल्या गुरुद्वारा साहिब येथे जेवण तयार करुन त्याचा पुरवठा केला जात आहे. याबरोबरच औषधांचेही वाटपही केले जात आहे. यासाठी बोर्डाच्या वतीने स्वतंत्र टीम तैनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना दिवसातून 3 वेळा जेवण पुरविण्याबाबतही विशेषदक्षता घेतली जात आहे.
गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने दररोज 500 रुग्णांना येथे भोजन दिले जात आहे. यासाठी सांगली गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह, सविंदर सिंह चड्ढा, उपाध्यक्ष हरजीत सिंह खंगुरा, सचिव दातारसिंघ जुनेजा आदी गुरुद्वारा बोर्डाला मदत करत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयाद्वारे गुरुद्वाराच्या टीमचा गौरव करण्यात आला. सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात स्वातंत्र्यदिनी सन्मानपत्र देवून टीमचा गौरव करण्यात आला.