नांदेड - शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या शेतकरी साखर कारखान्याचा चेअरमन अभिजित देशमुखल याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अभिजित देशमुख हा महाराष्ट्र शेतकरी शुगर लि. कारखान्याचा चेअरमन असून त्याच्या विरोधात उसउत्पादक शेतकऱ्यांचे 2 कोटी 5 लाख 25 हजार 985 रुपये दिले नसल्याने 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
परभणी जिल्ह्यातील सायखेडा येथील शेतकरी शुगर लिमिटेड कारखान्याचा चेअरमन अभिजीत देशमुखने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला होता. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर त्याला रविवारी रात्री पोलिसांनी पुण्यातून अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरवाडे यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला नांदेड न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
साखरेची मळी तयार करुन त्याच्या विक्रीतून 5 कोटी 65 लाख 20 हजार रुपये कमाविणाऱ्या देशमुखने शेतकऱ्यांचे उसाचे 2 कोटी 5 लाख 25 हजार 985 रुपये दिले नाही. सन 2014 मध्ये मुदखेड तालुक्यातील अनेक गावांमधून महाराष्ट्र शेतकरी शुगर लि. या साखर कारखान्याने हजारो टन उस खरेदी केला होता. न्याहाळी गावातील गोविंद संभाजी गोपनपल्ले यांनी पहिल्यांदा 70 टन उस दिला होता. त्यांच्यानंतर 67 शेतकऱ्यांनी 3 हजार टन उस दिला होता. मात्र कारखान्याचे चेअरमन अभिजीत उत्तमराव देशमुखने शेतकऱ्यांचे पैसे थकवले होते. तेव्हा गोविंद संभाजी गोपनपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून 8 जुलै 2016 ला मुदखेड पोलीस ठाण्यात चेअरमन अभिजीत देशमुख व इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.