नांदेड - तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील कारकुनाविरोधात खोट्या तक्रारी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. प्रेमानंद लाठकर यांची खोटी तक्रार करुन बालाजी जोगदंड या व्यक्तीने खंडणीसाठी तगादा लावला होता. लाठकर यांच्यावर खोटे आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयात बदलीचा अर्ज देऊन बालाजी जोगदंड याने लाठकर यांना मोठ्या रक्कमेची मागणी केली होती. त्याच्या छळाला कंटाळून लाठकर यांनी वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. त्यानंतर जोगदंड याला सापळा रचून 5 हजार रुपयाची खंडणी स्वीकारताना अटक झाली आहे. व्हीआयपी रोड नांदेड येथे पंचासमक्ष ताब्यात आरोपीला घेतले. याबाबत नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी माहिती दिली आहे.
वारंवार अप्रत्यक्ष पैशांची मागणी
प्रेमानंद लाठकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बालाजी जोगदंड याने अर्ज केला होता. त्यानंतर जोगदंड वारंवार फोन करुन अर्ज मागे घेतो, मला गाडी घ्यायची आहे, अशा शब्दात अप्रत्यक्षरित्या पैशाची मागणी करत होता. त्यानंतर लाठकर यांनी पोलीस स्टेशन वजीराबाद नांदेड येथे त्याच्या विरुद्ध 19 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. लाठकर यांना 20 नोव्हेंबर रोजी जोगदंडचा फोन आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. बालाजी जोगदंडने लाठकर यांना बाहेर एकटे बोलावले.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, जवळच्या नातेवाईकाला अटक
नोटांचे क्रमांक लिहून दिले पाकिट
त्यावेळी पोलिसांनी लाठकर यांच्याकडील भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटाचे क्रमांक लिहून पंचनामा केला. लाठकर बोलावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर जोगदंडने अर्ज मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी लाठकर यांनी त्यांच्याजवळच्या क्रमांक लिहिलेल्या नोटा जोगदंडला दिल्या. त्याचवेळी पोलिसांनी जोगदंड याला पुराव्यानिशी अटक केली.
हेही वाचा - कार्तिकी वारी पंढरपूरमध्ये एसटी बससेवेला सशर्त परवानगी, खासगी वाहनांना मात्र बंदी