नांदेड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, मुदखेड येथे लॉकडाऊनचा फज्जा उडालेला पाहायला मिळाले. नागरिक भाजीपाला आणि फळवाल्यांजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून आले.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात राज्यात सर्वाधिक कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. लॉकडाऊन सुरू असताना नागरिक बाहेर पडू नयेत यासाठी पोलीस रात्रंदिवस शहरात गस्त घालत आहेत. मात्र, नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही.
नांदेडमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता. मात्र, तीन दिवसांपूर्वी शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. मात्र, मुदखेड येथील नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरू असताना देखील हॉटेल, जनरल स्टोअर्स, पानपट्टी, अशी दुकाने बेकायदेशीरपणे उघडण्यात आली आहेत. तसेच नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. इतकेच नाहीतर कुणी तोंडाला मास्क सुद्धा लावलेले नाही. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २२ जणांवर मुदखेड नगर पालिकेने कारवाई केली आहे.