नांदेड - दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावच्या 'श्री क्षेत्र खंडोबा' यात्रेची ओळख आहे. या यात्रेत सर्व प्रकारच्या जनावरांची खरेदी-विक्री केली जाते. मात्र, सर्वांना आकर्षित करणारा ठरतो तो गाढवांचा बाजार. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे फोन पे आणि पेटीएम येण्याच्या कित्येक वर्षांपूर्वीपासून हा बाजार कॅशलेस चालत आहे.
शे-पाचशे रुपये घेऊन कुठलीही लिखापडी न करता इथे गाढव दिले जाते. दुसऱ्या वर्षी याच बाजारात त्या ग्राहकाकडून पैसे घेतले जातात. गाढवाचे व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवहार केवळ विश्वासावर करत आहेत. राज्यात जेजुरी, जुन्नर, मढी, सोनारी येथे गाढवांचा बाजार भरतो. मात्र, जेजुरीनंतर माळेगावचा बाजार सर्वात मोठा आणि प्रसिद्ध आहे.
हेही वाचा - कासेगावात यल्लमादेवीची यात्रा; यात्रेसाठी ५ हजार जोगती दाखल
शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून गाढवाचे विक्रेते आणि ग्राहक इथे येतात. गावरान, काठेवाडी, पंजाबी अशा जातीच्या गाढवांची विक्री इथे केली जाते. गाढवाला त्याच्या कामाच्या क्षमतेनुसार पंधरा हजार ते साठ हजार प्रति जोडी, असा भाव मिळतो. जेव्हापासून यात्रा भरते तेव्हापासून हा व्यवहार इथे चालत आला आहे. काही व्यापाऱ्यांची ही तिसरी-चौथी पिढी आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळामुळे बाजारावर मंदीचे सावट होते. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने गाढवांच्या बाजारात तेजी आहे.