नांदेड - शहराच्या पीर बुऱ्हाणपूर भागातील एका ६४ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा जिल्हा प्रशासनाने त्या वृद्धावर तात्काळ उपचार सुरू केले. यानंतर त्या रुग्णांची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. यात त्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण त्या रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशात नांदेडमध्ये २१ एप्रिलपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आला नव्हता. त्यामुळे नांदेड पॅटर्नची चर्चा होऊ लागली होती. २१ मार्चच्या रात्री, आठ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पीर बुऱ्हाणपूर भागातील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा प्रशासनाने तात्काळ त्या रुग्णावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू केले.
गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयात त्या रुग्णावर उपचार सुरू होते. पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. त्यात मधुमेह, अस्थमा यासह अनेक आजार त्या रुग्णाला होते. आज गुरुवारी त्या रुग्णाचा अखेर मृत्यू झाला. या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ व डॉ. राजेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. महत्वाचे बाब म्हणजे, दुसऱ्यांदा जेव्हा त्या रुग्णाचा स्वॅब तपासण्यात आला तेव्हा त्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दरम्यान, या मृत्यूनंतर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सक्तीचे पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल, आई-बाबांना देतोय सुरक्षेचे धडे
हेही वाचा - व्हिडिओ : हातात दंडुका घेऊन नियम शिकवणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्याच तोंडाला जेव्हा नसतो मास्क..