नांदेड- केंद्र सरकारने संसदेमध्ये नुकत्याच मंजूर करून घेतलेल्या शेतकरी व कामगार विरोधी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शुक्रवार (२ ऑक्टोबर) नांदेडात प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्च काढला जाणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण हे या लाँगमार्चचे नेतृत्व करणार आहेत.
या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चची सुरूवात दि .२ रोजी सकाळी १० वाजता रेल्वेस्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात येणार आहे. त्यानंतर हा लाँगमार्च छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मनपासमोरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करेल. तर या लाँगमार्चची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर होईल.
या लाँगमार्चचे नेतृत्व पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे करणार आहेत. बैलगाडी लाँगमार्चमध्ये माजी आमदार अमिताताई चव्हाण, डी. पी. सावंत, आमदार माधवराव पा. जवळगावकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, ईश्वरराव भोसीकर, वसंतराव चव्हाण, हणमंतराव पा.बेटमोगरेकर हे सहभागी होणार आहेत.
त्यानंतर काँग्रेसचे शिष्टमंडळ पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देणार आहे. लाँगमार्चचमध्ये सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्च मध्ये शेतकरी आणि कामगार यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रसचे महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मो. मसुद खान, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब यांनी केले आहे.