नांदेड : कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात आलेल्या भूकंपावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे - फडवणीस सरकार अस्थिर असल्यामुळेच भाजपला असले फोडाफोडीचे राजकारण करावे लागत आहे, अशी टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
'कॉंग्रेस शिवसेना आघाडी कायम राहील' : अशोक चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार फुटले असले तरी राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी कायम राहील असा विश्वास उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन : नांदेड येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना सूचना देत अशोक चव्हाण यांनी आपल्या मतदार संघात कामाला लागा अशा सूचना दिल्या. भक्ती लॉन्स येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मतदारसंघांनुसार आढावा घेण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शरद पवारांचा पाठिंबा नाही : पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शपथविधीला उपस्थित नव्हते. रविवारी दुपारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांमध्ये जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरे यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
- Maharashtra Political Crisis : ... म्हणून आम्ही एकत्र आलो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री! अजित पवारांनी घेतली 3 वर्षांत तिसऱ्यांदा शपथ
- NCP Political Crisis : शिंदेपाठोपाठ अजित पवारांचे राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडणार का? राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ