नांदेड - मागील १५ वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीकडे सत्तेची चावी असतानाही विकास करण्यात आला नाही. नांदेड जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळूनही जिल्ह्यातून १ किलोमीटरही राष्ट्रीय महामार्ग गेला नाही ना कोणता प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. पण तुम्ही भाजपच्या उमेदवाराला दिल्लीत पाठवा. जिल्ह्याचे चित्र पालटवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
देगलूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. तसेच येणाऱ्या काळात १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देत त्यावर ५ वर्षांत कोणतेही खर्च न आकारण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मागील १५ वर्षांमध्ये केवळ साडेतीनशे कोटी रुपयांचा विकासनिधी दिला. परंतु, युती सरकारने मागील ५ वर्षांमध्ये २ हजार २२६ कोटींचा विकास निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये होईल एवढे मोठे काम सरकारने केले आहेत. यापूर्वी नांदेडमध्ये कुठलाही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची १८ हजार कोटीची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतीय सैनिकांच्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबासाठी राखीव असलेली घरे खाऊन टाकतात आणि आपण आदर्श असल्याचे सांगतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
यावेळी भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.