नांदेड - राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचे शुक्रवारी नांदेडमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाभरातून समर्थक नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी नांदेड विमानतळ ते रेस्टहाऊसपर्यंत रस्त्यावर नागरिकांच्या अक्षरशः रांगा लावल्या होत्या.
हेही वाचा... सतरा वर्षानंतर रितेशच्या 'त्या' गाण्याची शूटिंग अन ते ही बाभळगावात...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारमध्ये नांदेडचे भूमिपूत्र अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर चव्हाण यांचे शुक्रवारी प्रथमच नांदेडमध्ये आगमन झाले. त्यामुळे त्यांच्या स्वागताला जिल्हाभरातील समर्थकांनी गर्दी केली होती. जवळपास साडेनऊ वर्षानंतर नांदेडचा राजकीय वनवास संपला. त्यामुळे काँग्रेस समर्थकांत प्रचंड उत्साह संचारलेला दिसून आला.
हेही वाचा... दोन्ही उमेदवारांना समान मते, औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक स्थगित
शुक्रवारी दुपारी अशोक चव्हाण विमानाने नांदेडमध्ये दाखल झाले. त्यावेळी विमानतळावर हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. अशोक चव्हाण यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी देखील चव्हाण यांचे स्वागत केले.
हेही वाचा... सत्तेसाठी लाचार शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर गप्प का?
नांदेड विमानतळ ते रेस्ट हाऊस दरम्यान जागोजागी अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. जिल्ह्यातील युवक काँग्रेस, महिला आघाडी, आजी माजी आमदारांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 'मध्यंतरीच्या काळात नांदेड सत्तेपासून वंचित राहिल्याने नांदेडच्या विकासाचा वेग मंदावला होता. आता मात्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने विकासकामांचा धडाका होईल', अशी अपेक्षा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.