नांदेड - शिंदीतून (पेय) विषारी औषध देऊन महिलेची हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. अकबरी नईम खान असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेची बहिण सुलताना शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चौघींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना शहरातील तेहरानगर भागात घडली आहे.
हेही वाचा - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अरण येथे तिहेरी अपघात, तीन ठार
अकबरी नईम खान (वय 39) या तेहरानगर भागात वास्तव्यास आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने अकबरी यांच्या भावाविरोधात गुन्हा नोंद केला होता. ही तक्रार आम्ही मागे घेतो त्याबदल्यात पैसे द्या, असे म्हणत हे चावरे कुटूंब अकबरी यांना बोलवून घेत असे. बुधवारी दिवसभर अकबरी या प्रज्ञा चावरे यांच्या घरी होत्या. सायंकाळी अकबरी यांच्या बहिणीने फोन केला असता, मी दिवसभर प्रज्ञाच्या घरीच असल्याचे सांगितले. दरम्यान, रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकबरी बेशुद्ध असल्याचे आढळून आले.
संशयआल्याने नातेवाईकांनी पोलिसांना बोलावले. रुग्णालयात अकबरी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आपल्या बहिणीला शिंदीतून विष पाजून ठार मारल्याची तक्रार सुलताना बेगम माजीद शेख यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी बेबीताई उर्फ सुकेशनी चावरे, बबली कौर, प्रज्ञा चावरे, प्रतीक्षा या चौघींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून दोघींना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी पोलिसांना गुंगारा देवून फरार झाल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक डोके अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - औरंगाबादेत लाच स्वीकारताना पालिका अभियंतासह नगरसेविकेचा पती एसीबीच्या जाळ्यात