नागपूर - शहराला लागून असलेल्या हिंगणा रोडवरील इंड्सइंड बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एक ३५ वर्षीय तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याच्या शरीरावर कुठेही हाणामारीच्या खुणा नाही. फक्त त्याच्या हाताची नस कापलेली होती. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मात्र, त्याच्या हाताची नस कोणी व का कापली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
हिंगणा परिसरातील आसयी चौक येथे इंड्सइंड बँकेचे एटीएम आहे. आज त्याठिकाणी एक ३५ वर्षीय तरुण रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिकांना दिसला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. तो दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. नशेमुळे त्याला एटीएममधून बाहेर येण्यासाठी दरवाजा कसा उघडावा? हे सूचले नसावे. त्यामुळे त्याने एटीएमची काचेची भिंत हाताने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याच्या हाताची नस कापली. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही बंद असल्याने आता एटीएम मशीनमध्ये इनबिल्ड सीसीटीव्ही तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या तरुणासोबत अन्य तिघांना त्या ठिकाणी पाहिले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली? याचे गूढ वाढले आहे.