नागपूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना आहे. भाजप सरकारचा हा ७ वा अर्थसंकल्प असून, प्रत्येक वर्षी सारखाच अर्थसंकल्प असल्याचे मत अर्थतज्ज्ञ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी १६ कलमी योजना आणली आहे, मात्र यामध्ये नवीन काहीच नसल्याचे विजय जावंधिया म्हणाले.हे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. पिकांना हमी भावच नाही. शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर सौर ऊर्जा तयार करावीआणि ती विकावी असे अर्थसंकल्पात म्हणले आहे. कोरडवाहू शेतीत आम्हाला या सौरउर्जेतून १५ हजार एकरी उत्पन्न होईल, याची हमी द्या, आम्ही अन्नदाता शेतकरी होण्यापेक्षा ऊर्जा दाता शेतकरी होऊ असेही विजय जावंधिया म्हणाले.