नागपूर - नागपूर जिल्हातील उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी गावात चार दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर करण्यात आलेल्या आयोजनात काही तरुण आणि तरुणींनी विवस्त्र होऊन केलेल्या अश्लील डान्स प्रकरणात उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर उर्फ लाला प्रभुजी मांढरे, सुरज निळकंठ नागपूरे, अनिल शालीकराम दमके या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी दिली.
तीन आरोपींना घेतले ताब्यात -
उमरेड पोलिसांनी तिघांवर कलाम २९४, ११४, १८८, ३४ भा.द.वि. सह कलम १३१ (अ), ११०, ११२, ११७ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्ह्यातील नमुद तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय अलेक्स डान्स शोच्या कलाकारांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील नग्न डान्सचा व्हिडिओने राज्यभरात खळबळ -
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर आयोजित डान्स हंगामा कार्यक्रमात अश्लील नग्न डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्हातच नाही तर राज्यभर एकच खळबळ माजली आहे. 17 जानेवारीच्या रात्री डान्स हंगामा नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,त्यात अश्लीलतेचा कळस गाठण्यात आला होता. तब्बल चार दिवस पोलिस या आयोजनच्या संदर्भात अनभिज्ञ होते. आज या अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी शहानिशा करून आयोजकांसह कार्यक्रमात अश्लील डान्स करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांसह ब्राम्हणी गावचे संरपंच सुध्दा अनभिज्ञ -
अश्लीलतेचा कळस गाठणार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुद्धा पोलिसांना या संदर्भात कोणतीही कल्पना नव्हती. व्हायरल झालेला व्हिडिओ नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याच्या ब्राम्हणी गावातील आहे. ब्राम्हणीमध्ये काही दिवसांपूर्वी डान्स हंगाम नामक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राम्हणी गावचे सरपंच रितेश आंबोने यांना या संदर्भात संपूर्ण साधला असता ते म्हणाले की, मला या डान्स हंगामा कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात कुठलीही माहिती नव्हती. सध्या कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्याने अश्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देता येत नाही, आयोजकांनी सुद्धा आमच्याकडे कोणतीही परवानगी मागितली नाही, त्यामुळे मला या कार्यक्रमा संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सरपंच रितेश आंबोने यांनी सांगितले आहे.