नागपूर - नागपूरसह विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. तरीही या रखरखत्या उन्हात पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. ऊन, पावसाची तमा न बाळगणाऱ्या नागपूर विभागातील वाहतूक पोलिसांना ४६ डिग्री तापमानातही भर रस्त्यात उभे राहून वाहतूक नियंत्रण करावे लागते. ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहराचे तापमान ४५ अंशावर आहे. या जीवघेण्या उन्हामुळे रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशा भीषण परिस्थितीत नागपूर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावताना अनेक अडचणी येत आहेत. सलग ५ मिनिटे उन्हात उभे राहणे शक्य होत नसल्याने वाहतूक पोलिसांना सावलीचा आधार घ्यावा लागतो, मात्र तितक्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांना भर उन्हात उभे राहून वाहतूक नियंत्रित करावी लागत आहे.
दरवर्षीच पोलिसांना या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागपूर पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.