नागपूर - फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारे इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
इंडिगोची 6E404 आणि 6E663 ही दोन्ही कोलकाता-नागपूर विमाने अनुक्रमे रात्री ८ आणि रात्री १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतात. पण फनी चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आली आहेत. कोलकाता विमानतळावरून शनिवारी ६ वाजेपर्यंत विमानांची ये-जा बंद राहणार आहे.
याशिवाय चेन्नईहून दुपारी ३.३० वाजता नागपुरात येणारे विमान तांत्रिक कारणांमुळे हैदराबादला वळवण्यात आले. हे विमान चेन्नई येथून १.४५ वाजता रवाना होते. पण शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता नागपुरात आले आणि ६.४५ वाजता चेन्नईकडे रवाना झाले. तसेच इंडिगोचे 6E436 इंदूर-नागपूर विमान ३७ मिनिटे उशिरा रात्री ८.३२ वाजता आणि गो एअरचे जी-8 2519 दिल्ली-नागपूर विमान २९ मिनिटे उशिरा अर्थात रात्री ९.२४ वाजता पोहोचले. त्यामुळे नागपुरातून देशाच्या अन्य शहरांमध्ये उड्डाण भरणाऱ्या विमानांना उशीर झाला.