नागपूर - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईसह पुणयात कोरोनाचे प्रमाण जास्त आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातही दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नागपुरात आज आणखी 2 नव्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58 झाली आहे. दोन्ही रुग्ण नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
नागपुरात आज सापडलेल्या 2 रुग्णापैकी एकाने दिल्ली तर दुसऱ्याने अजमेरचा प्रवास केला होता. प्रशासनाने दोघांनाही विलगीकरण केंद्रात ठेवले होते. आज त्यांचे रिपोट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची तब्येत उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तब्बल 36 तासात एकही कोरोनाबाधित रुग्ण समोर आला नव्हता. मात्र, आता दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोन नवीन रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 58 वर गेली असली तरी 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आणखी दोघांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. मात्र, त्यांना अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही. कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 44 राहिली आहे. शिवाय एका रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे.