नागपूर - नागपूर आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील रुखडी शिवारात नागपूर-जबलपूर महामार्गावर वाघ तब्बल दोन तास ठिय्या मांडून बसल्याचे समोर आले. परिसरातील नागरिकांनी वाघाचा व्हिडिओ केला आहे. मात्र, वाघाला परत जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात वनविभागाला यश आले.
नागपूर-जबलपूर महामार्गावर राज्य सीमेपर्यंत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या कुरई घाटीत काम सुरू असल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तसेच या भागात पेंच व्याघ्र प्रकल्प असल्याने रस्त्यावर वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. बुधवारी रात्रीदेखील देवलापारपासून ४० किमी अंतरावरील रुखड शिवारात उड्डाणपुलावर अगदी रस्त्याच्या मधोमध हा वाघ बसला होता. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना या वाघाचे दर्शन झाले. त्यांनी व्हिडिओ देखील काढला. त्यानंतर वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचा ताफा पोहोचल्यानंतर तब्बल दोन तासांनी वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यास त्यांना यश आले.