नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सजिन व रेमडेसिवीरचा मुबलक पुरवठा व्हावा याकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र, तिसरी लाट जर आली तर, त्यासाठी तीन ते चार पट रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
भेसळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना
नागपूर दौऱ्यावर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये सणासुदीच्या या काळात भेसळखोरी थांबवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेसळखोरांवर कडक करवाई करावी, अशी सूचना दिली आहे. तसेच अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल, रेस्टॉरंटसह मिठाई आणि नमकीन तयार होत असलेल्या ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन कारवाई करा, स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या मिठाई भांडारमधील मिठाईवर एक्सपायरीचा दिनांक आहे का नाही याची तपसाणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा राज्यात आणि नागपूर विभागात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. हे लक्षात घेऊन ऑक्सीजनचा साठा अधिक सुलभतेने आणि सहज उपलब्ध व्हावा यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्य शासनाने या संदर्भात साठवणुकीचे सूत्र ठरवले असून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक साठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बेकायदेशीररित्या रेमिडीसीवीर इंजेक्शन विक्री आणि साठेबाजी करणाऱ्यांवर यापूर्वीच कारवाई झालेली आहे. अशा धडक कारवाईचे प्रमाण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्येही होणे गरजेच आहे, असे मंत्री शिंगणे म्हणाले.
केंद्राच्या सूचनेनुसार तीनपट ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न सुरू
यावेळी त्यांनी म्युकरमायकोसीससह अन्य आजारांवर आवश्यक असलेल्या औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. कोरोना काळात बारसे ते तेराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता राज्याची होती. केंद्राच्या मदतीने 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले. मात्र, आता पुढील धोका लक्षात घेऊन केंद्राच्या सूचनेनुसार तीनपट ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री शिंगणे म्हणाले.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये हे सर्व पक्षांचं मत, न्यायालयाचा पर्याय उपलब्ध - विजय वडेट्टीवार