नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विरूर वन परिक्षेत्रात धूमाकूळ घालणाऱ्या आरटी-१ वाघाला वनविभागाने नुकतेचे जेरबंद केले. त्यानंतर आता त्या वाघाला नागपूरातील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. वाघावर वैद्यकीय उपचारही या केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा वन परिक्षेत्रात आरटी-1 नावाच्या वाघाने धूमाकूळ घातला होता. या वाघामुळे परिसरातील नागरिक धास्तावले होते. वन विभागाकडूनही त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर अखेर बुधवारी (२८) त्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्यानंतर आता या वाघाला सुरक्षेच्या दृष्टीने नागपुरातील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. शिवाय पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहीतीनुसार त्याला जखमा झाल्याने विलगीकरण कक्षात ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.