नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात नागपूर पोलीस गंभीर नसल्याचे दाखवणार एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत आले होते. त्या ठिकाणी लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पोलिसांनी वाऱ्यावर सोडून दिल्याचे बघायला मिळत आहे.
सोमवारी नागपुरच्या मुंडले शाळेत सरसंघचालक एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांची व्याख्यान होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे, त्यामुळे नियमाप्रमाणे सीआयएसएफचे कमांडो सरसंघचालक यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या अवतीभवती तैनात होते. तर शाळेच्या आवारात पोलीस होते. पोलिसांनी वरच्या मजल्यावर सभागृहाच्या दारावर मेटल डिटेक्टर लावले होते. नियमाप्रमाणे मेटल डिटेक्टरजवळ पोलीस उपस्थित राहून सभागृहात येणाऱ्या लोकांची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, नागपूर पोलिसांनी मुख्य दारावरची सुरक्षा आणि मेटल डिटेक्टर वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र एका नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. त्या दक्ष नागरिकाने या संदर्भातले व्हिडिओ समोर आणले असून त्यात पोलिसांचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळेच नागपूर पोलीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेसंदर्भांत गंभीर नाहीत का असा प्रश्न विचारला जातोय?