नागपूर - शहरातील अनेक भागात चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याने, चोरांना पकडण्यासाठी एका पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने ११ आरोपींच्या एका टोळीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५ मोटारसायकलीसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गंभीर बाब म्हणजे, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये ९ अल्पवयीन मुले आहे.
मागील १० दिवसांपासून नागपूरच्या विविध भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. ज्यामध्ये वाहन चोरीसह मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांचा समावेश आहे. या शिवाय मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्यांना आणि पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना देखील वाढल्या होत्या. या आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांचे एक पथक प्रयत्न करत होते.
कसा लागला चोरांचा शोध -
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी लुटमारी आणि चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध सीसीटीव्हीच्या आधारे सुरू केला. तेव्हा एका आरोपीचा सुगावा लागला. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करुन या प्रकरणात एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी नऊ आरोपी अल्पवयीन आहेत. अमर खरात आणि मिलिंद हिराणी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.