नागपूर- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नागपुरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराच्या नावाखाली लाखोंचे बिल आकारण्यात येत आहे. अशा रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा. या मागणीसाठी नागपूरकरांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. शिवाय अव्वाचे सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांचे परवाने रद्द करा, अशी मागणीही केली.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार खासगी रुग्णालये बिल आकारत नाही. आपल्याच मनमर्जीने सामान्यांचे आर्थिक शोषण करतात, अशी तक्रार नागपूर सिटिझन फोरमकडून करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्तांनीही त्यांच्या समस्या जाणून दोषी रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, आजवर ज्या रुग्णांकडून अधिकचे बिल आकारण्यात आले आहे, त्यांनी महानगरपालिकेकडे बिल सादर करावे. त्यानुसार कारवाई करणार असल्याची ग्वाही आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.
शिवाय, रुग्णालयातील खाटांमधे होणारा घोळही थांबवण्याची मागणी नागपूर सिटिझन फोरमकडून करण्यात आली. त्याचबरोबर, पीपीई किटचे वाढीव दर देखील नियंत्रणात आनावे. या सगळ्या मागण्या पुढील सात दिवसात पूर्ण केल्या नाहीत, तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.
हेही वाचा- पैशाच्या वादातून गुंडाचा खून; तिघांसह एक अल्पवयीन आरोपी अटकेत