नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका करणे एका याचिकाकर्त्यांला चांगलेच महागात पडले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्ते सुरेश रंगारी यांना दोन लाखांचा दंड ठोठावत याचिका फेटाळून लावली आहे.
याचिकाकर्त्यांनुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना आपल्यावरील अॅट्रॉसीटीच्या गुन्ह्यांची माहिती लपवलेली होती. या संदर्भात याचिकाकर्त्याने वर्धा शहरातील सावंगी मेघे येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फडणवीस यांनी आपल्या वरील गुन्ह्याची माहिती लपवून विधानसभा निवडणूक लढवली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. तेव्हा याचिकाकर्ते सुरेश रंगारी आपला दावा न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे याचिकाकर्ते रंगारी यांनी वैयक्तिक उद्देशासाठी ही याचिका दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. सुरेश रंगारी यांनी न्यायालयाचा वेळ वाया घालवला असल्याने त्यांच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम 29 नोव्हेंबरपर्यंत न भरल्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येणार आहे.