नागपूर - नागपुरात सासू-सुनेच्या भांडणाचा परिणाम केवळ 6 महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्याला भोगावा लागला. चिमुकल्याच्या आईने या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला होता. त्याला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. आता त्या चिमुकल्याचे आईने माफी मागितली आहे. पुन्हा मारणार नाही, अशी ग्वाही चिमुकल्याच्या आईने दिली आहे. आता माफीचा व्हिडिओ समोर आला आहे.
काय आहे माफीच्या व्हिडिओत?
हे प्रकरण पोलिसात गेले. चिमुकल्याला मारणाऱ्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तिची समजूत काढण्यात आली. आता तिने माफी मागत पुन्हा कधीच लेकराला मारणार नाही म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोणीतरी मुलाला पुन्हा मारहाण करणार का? असा प्रश्न विचारला आहे. यावर मारहाण करणारी आई हात जोडून 'मी मुलाला पुन्हा आयुष्यात कधीच मारहाण करणार नाही. मुलाला, पतीला कोणालाच त्रास देणार नाही. मुलाचा चांगला सांभाळ करेन. त्याचे चांगले करियर घडवेन. माझ्याकडून चूक झाली', असे म्हणत आहे.
स्वतःला दुखापत करणार नाही
तसेच, पतीच्या, सासू-सासऱ्याच्या त्रासामुळे स्वतःच्या जीवाला काहीही दुखापत करून घेणार नाही, असेही तिच्याकडून वदवून घेण्यात आले आहे. यामध्ये तिला कोणीतरी महिला प्रश्न विचारत आहे. मात्र, वदवून घेणारी महिला कोण आहे? याबद्दल अजूनही काही स्पष्ट झालेले नाही. याबद्दल अनेक चर्चा होत आहे. पोलिसांकडूनही अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
चिमुकल्याला अमानूष मारहाण
सासू आणि सुनेचे भांडण सुरू असतानाच लहान मुलाला मारहाण करणारा हा व्हिडिओ 24 मे रोजीचा असल्याचे पुढे आले आहे. यात 20 वर्षांची एक महिला तिच्या 6 महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाण करत आहे. मुलगा रडत असतानाही त्याला गादीवर आपटून मारत आहे. कोणालाही संताप येईल असा हा प्रकार आहे. धक्कादायक म्हणजे जिथे लहान मुले हे आईसाठी काळीज म्हटले जाते, तिथे हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त होत आहे. हे कुटुंब झोपडपट्टीत राहत असून मुलाचे वडिल हे ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. मुलाची आजी ही मोलकरीण म्हणून काम करत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
गुन्हा दाखल करून समज देऊन आईची सुटका
सासू-सूनेच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या भांडणाचा राग निर्दयी आईने चक्क 6 महिन्यांच्या चिमुकल्यावर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आई मुलाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. हा व्हिडिओ नागपुरातील पांढराबोडी झोपडपट्टी भागातील असल्याचे लक्षात आले. यानंतर अंबाझरी पोलिसांनी आणि बालकल्याण विभागाने याची दखल घेतली. अंबाझरी पोलिसांनी मुलाच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून सर्व प्रकार समजून घेतला. सुरवातीला मुलाच्या आईची समजूत काढण्यात आली. सोबतच मुलगा सुरक्षित आहे का नाही? याची खात्री करून घेतली. तर बालकल्याण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन, एनजीओला सुद्धा पाचारण करण्यात आले. यामध्ये त्या मुलाच्या आईचे समुपदेशन करण्यात आले. तसेच कायद्या संदर्भात माहिती देण्यात आली.
या प्रकरणात चिमुकल्याला मारहाण केल्याने कलम 323 भादवीक अंतर्गत आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आईला समज देऊन सोडण्यात आले आहे.