नागपूर - चोरीच्या संशयातून जमावाने मनोरुग्ण तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी फाटा येथे ही घटना घडली आहे. सध्या कळमेश्वर तालुक्यात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चोरांची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
लोकं रात्रभर जागून चोरांचा शोध घेत आहेत. अशातच या तरुणाच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने जमावाने त्याला ताब्यात घेतले. तुझे आणखी साथीदार कुठे आहेत? अशी विचारणा करत जमावाने काठ्यांनी त्याला मारहाण केली. काही वेळातच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासमोरही जमावाने त्या तरुणाला मारहाण केली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका केली व त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीनंतर तो चोर नसून मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा - 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस