नागपूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करून डीबीटी तत्वावर पैसे दिले जात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी केला आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक नलिनी भोयर यांच्याकडे जाऊन जाब विचारला. शेतकरी गटाची अशा पद्धतीने फसवणूक होत असल्याने संतापही व्यक्त केला.
डीबीटी योजनेला फाटा का दिला..?
राज्य सरकारच्या आत्मा या प्रकल्पा अंतर्गत 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीसाठीचे साहित्य देण्याची योजना आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी 90 टक्के सबसिडीचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. पण, कृषी विभागाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करत साहित्य खरेदी करण्यात आले. यामध्ये खरेदी करण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून बाजारात मिळणाऱ्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीत हे विभागाच्यामार्फत शेतकरी गटांना जबरदस्तीने सह्या करून दिले जात होते, अशी तक्रार आमदार जयस्वाल यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केली होती.
जिल्हा कृषी अधीक्षकांना विचारला जाब
यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी हा भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी हे निकृष्ट कृषी साहित्य घेऊन चक्क जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेतली. यात शेतकऱ्यांना बाजारातून, वाटेल त्या दुकानातून पाहिजे ते साहित्य विकत घेण्याची मुभा आहे. पण, काहींनी संगनमत करून दोन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक नलिनी भोयर यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरीही उपस्थित होते.
अवाच्या सवा दरात विकले जात होते साहित्य
यात अडीच हजारात मिळणार पंप हा 4 हजारांत दिला जात होता. यासोबत सहा हजारात मिळणार यंत्र हे त्यापेक्षा कितीतरी जास्त किंमतीत विकले जात होते. सर्व माल गावांमध्ये पोहण्यापूर्वीच वाटप झाल्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. बाहेरून विकत घेण्याचे राज्यसरकारचे आदेश असताना प्रकल्प संचालक (आत्मा) या संबंधित कंपनीचे खरेदी करण्याचे आदेश काढले. शेतकरी जेव्हा तक्रार करायला गेले तेव्हा माल खरेदी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही, असे म्हणत दिशाभूल आत्माच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. याबाबतही जाब कृषी अधीक्षकांना आमदार जयस्वाल यांनी विचारला आहे.
कृषी मंत्र्यांनी चौकशी करत करवाई करावी
या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र काही अधिकारी अशा पद्धतीने भ्रष्टाचार करत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, असे म्हणत आमदार जयस्वाल यांन कृषिमंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा - विदर्भवाद्यांचे जेलभरो अन् रस्ता रोको आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात