नागपूर - पती-पत्नीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मेहुणीच्या एक महिन्याच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पारशिवणी येथील बाखरी (पिपळा) गावात घडली. आज मंगळवारी त्या मुलाच्या नामकरणाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
गणेश गोविंद बोरकर असे आरोपीचे नाव आहे. तो जिल्ह्यातील कुही येथील रहिवासी आहे. त्याचे लग्न बाखरी (पिपळा) येथील खुशाल वारकर यांच्या मोठ्या मुलीशी झाले होते. गणेश नेहमीच त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे ४ दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी बाखरी गावी गेली होती. बायको नांदायला येत नाही या कारणावरून गणेश संतापला होता. तो गेल्या २ ते ३ दिवसांपासून सासरी जाऊन सासरच्या मंडळीसोबत वाद घालत होता.
नवरा-बायकोच्या भांडणात मेहुणीच्या बाळाचा खून
आरोपी गणेश सोमवारी दुपारी सासरी गेला. त्यावेळी बायकोसह सासरच्या मंडळींशी वाद घातला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात घरात झोपलेल्या मेहुणीच्या एक महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी कुहीच्या बाजारात लपून असल्याचे समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.