नागपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. मात्र, ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्या शहरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. तसंच ज्या शहरांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे सुतोवाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
हेही वाचा- EXCLUSIVE : निजामुद्दीनमधील संपूर्ण माहिती पोलिसांना होती, मरकझमधील उपस्थितासोबत खास बातचीत
आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. या लॉकडाऊनमध्ये ज्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी राज्याने 1 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. तसंच मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या शहरांमध्ये आधीच आंतरराष्ट्रीय विमाने बंद केली असती तर ही वेळ आली नसती, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 14 वा दिवस आहे.