नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. कोरोनामुळे जणू आपला देश आहे त्याच स्थितीत अडकून पडला होता. या काळात सामान्य नागरिकांची झालेली अवस्था ही पिढी तरी कधीही विसरू शकणार नाही. पण, जे कोरोना योद्धा सर्वात पुढे येऊन लढत होते त्यांच्या कुटुंबीयांना तरी कुणाचा आधार होता? अशा वेळेत एकमेकांच्या मदतीने आलेले संकट दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नागपूर पोलिसांनी केला.
शहराच्या सीमेवर असलेल्या कोराडी पोलिसांनी, तर एक नवा आदर्शच घालून दिला. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी, जे फिल्डवर तैनात आहेत त्यांना भाजी आणि फळांसाठी कुठेही वणवण भटकावे लागू नये या करीता कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात परसबाग फुलवली. मनात काही करून दाखवण्याची इच्छा असेल तर ते काम मार्गी लागते, या सूत्राचा अवलंब करतच शेख यांनी हा उपक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमामुळे ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सुखद धक्का मिळत आहे.
नागपूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोराडी पोलीस ठाणे आहे. बाहेरून बघायला हे पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशन सारखेच दिसते. पण, आपण आत प्रवेश केला तर पोलीस स्टेशनचा परिसर जरा हटके आणि वेगळा आहे. प्रवेश केल्यापासून दोन्ही बाजूने सुंदर रंगरंगोटी केलेली गाड्यांची चाके दिसतात. आजूबाजूची सगळी हिरवळ आणि झाडे पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना आकर्षित करते.
हेही वाचा- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
तक्रार घेण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दारातच टेबल-खूर्ची लावण्यात आली आहे. यामुळे पोलीस कर्मचारी सुरक्षित राहतील, आणि तक्रार द्यायला आलेल्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येणार नाही. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग होण्याचे टळेल. या उपक्रमामुळे ठाण्यातील पोलीस कर्मचारी खुश आहेत. १८ मार्च रोजी शेख हे कोराडी पोलीस ठाण्यात रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी या पोलीस स्टेशनला वेगळे रूप देण्याचा काम हाती घेतले. त्यांनी स्वतःचे केबिनसुद्धा झाडा खाली उभारले आहे.
वजीर शेख यांची कोराडी पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली त्यावेळी कोरोनाचा नागपूर मध्ये शिरकाव झाला होता. त्यामुळे, आपल्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना कसे सुरक्षित ठेवता येईल, यासाठी त्यांनी ही सगळी व्यवस्था केली. सोबतच ५०० झाडांची लागवड केली आणि पालेभाज्यांची बागही फुलवली. आठ महिन्यापूर्वी केलेला एक छोटासा प्रयत्न आज नंदनवनमध्ये रुपांतरित झाला आहे. पोलीस ठाण्यात सर्वसामान्य माणूस घाबरतो. मात्र, कोराडी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अनुभवानंतर कदाचित नागरिकांमध्ये पोलिसांची असलेली भीती कमी होऊन आदर वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा- गोस्वामी आक्रमक बोलतात, मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात वाट्टेल ते बोललेले चुकीचे नाही का?